जळगाव जिल्हा

सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील 3 री 4 थीच्या विद्यार्थ्यांनी साकारला शिक्षक दिन

पाचोरा-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, पाचोरा येथे आज दिनांक ५ सप्टेंबर २०२६, शनिवार रोजी तिन्ही सत्रांत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
भडगाव रोड विभागातील शिक्षक दिनाचा संपूर्ण कार्यक्रम यंदा विशेष ठरला. शिक्षकांच्या वेशभूषेत आलेल्या इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनीच संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी अत्यंत उत्साहाने आणि उत्कृष्ट नियोजनाने पार पाडली. आजच्या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांची निवडदेखील शालेय विद्यार्थ्यांमधूनच करण्यात आली होती.
शिक्षक दिनाच्या या अभिनव उपक्रमामागे विभाग प्रमुख श्री. दीपक पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षिका सौ. रुपाली पाटील मॅडम, सौ. सारिका पाटील मॅडम, सौ. जयश्री पाटील (महाजन), सौ. रुपाली निकम मॅडम, सौ. चारुशिला पाटील, श्री. महालपुरे सर आणि श्री. पंकज पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विशेष म्हणजे, शिक्षकांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ होऊ नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता यावे, यासाठी टीमवर्क पद्धतीने अध्यापन करण्याचा निर्णय स्वतःच घेतला. ही टीम-टीचिंगची कल्पना इयत्ता तिसरीचा विद्यार्थी विधान कोमल वाघ याच्या मनात आली. त्याने वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन टीमवर्क पद्धतीने अध्यापन करण्याची कल्पना मांडली आणि त्यानुसार जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले. एक विद्यार्थी वर्गासमोर उभा राहून शिकवणार, तर इतर चार विद्यार्थी वर्गातील विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ठेवणार, अशा पद्धतीने जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले.
यातील सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी ही टीमवर्क पद्धती कोणत्याही शिक्षकांनी सांगितल्याशिवाय स्वतःच्या मनाने आखली. विशेषतः या अभिनव टीम-टीचिंगची संकल्पना सुचवणाऱ्या विद्यार्थी विधान कोमल वाघ याचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. परिस्थिती ओळखून स्वतः नियोजन करणे, जबाबदाऱ्या वाटून घेणे आणि एकमेकांच्या सहकार्याने अध्यापन करणे, यातून विद्यार्थ्यांची कल्पकता, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता दिसून आली.
विद्यार्थ्यांच्या या अभिनव कल्पनेचे, शिस्तबद्ध नियोजनाचे आणि टीमवर्कमधून केलेल्या अध्यापनाचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारत केवळ शिक्षक दिन साजरा केला नाही, तर “एकत्र काम केल्यास कोणतेही आव्हान सहज पेलता येते” हा सुंदर संदेशही दिला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!