जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात भेसळ नाही का? FDA अधिकारी झोपेत की भेसळखोरांना अभय?

पाचोरा –

राज्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून भेसळखोरांवर धडाकेबाज कारवाया सुरू असताना पाचोरा शहर आणि तालुक्यात मात्र सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, “पाचोऱ्यात भेसळ होतच नाही का, की FDA अधिकारी डोळेझाक करत आहेत?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.शहरातील अनेक भागांत उघड्यावर मांस-मटण विक्री, धूळ व माशांच्या सान्निध्यात खाद्यपदार्थांची विक्री, सुट्ट्या तेलाचा वापर आणि संशयास्पद खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे दिसून येते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे प्रकार सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी नेमके काय करत आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

विशेष म्हणजे शहरातील काही दूध डेअऱ्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या मावा कुल्फी, पनीर, मावा, श्रीखंड, लस्सी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका व्यक्त होत आहेत. आज माव्याचे दर गगनाला भिडलेले असताना अवघ्या १० रुपयांत विकली जाणारी “मावा कुल्फी” नेमकी कशापासून तयार होते? FDA अधिकाऱ्यांनी कधी याचे नमुने घेऊन प्रयोगशाळा तपासणी केली आहे का? असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.पाचोऱ्यातील दूध डेअऱ्यांवर अचानक छापे टाकून दूध, मावा, पनीर आणि इतर पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असताना प्रशासनाची शांत भूमिका अनेक संशयांना जन्म देत आहे.दुसरीकडे, राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची विक्री पाचोऱ्यात काही ठिकाणी राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. गुटखा माफियांना नेमके कोणाचे संरक्षण आहे? बंदी असलेला गुटखा शहरात पोहोचतो कसा? आणि संबंधित यंत्रणा कारवाई का करत नाहीत? असे प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत.
पाचोरा शहर आणि तालुक्यात FDA, अन्न सुरक्षा विभाग, नगरपालिका प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्त विशेष मोहीम राबवून दूध डेअऱ्या, मांस-मटण विक्री केंद्रे, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे, सुट्टे तेल विक्रेते आणि गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? पाचोऱ्यातील भेसळीचे वास्तव FDA अधिकाऱ्यांना दिसणार का? की भेसळखोर आणि गुटखा माफियांना अभय देण्याचे कामच सुरू राहणार? असा संतप्त सवाल आता पाचोऱ्यातील जनता करत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!