जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाजाचा आढावा.

पाचोरा-
दिनांक 11-06-2026 रोजी पाचोरा तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच विभागनिहाय अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

बैठकीत प्रशासकीय कामकाज, उपलब्ध मनुष्यबळ, इमारतींची स्थिती, वाहन व्यवस्थापन, कार्यालयीन सुविधा, कृषी नियोजन, पूरनियोजन, पाणीपुरवठा तसेच शैक्षणिक तयारी या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी आवश्यकतेनुसार प्रशासकीय कार्यवाही करणे, उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन करणे, अपूर्ण व प्रलंबित कामांना गती देणे, आवश्यक दुरुस्ती व देखभाल करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे, नागरिकाभिमुख सेवा वेळेत उपलब्ध करून देणे तसेच विभागीय समन्वयातून कामकाज अधिक परिणामकारक करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना राबविणे, शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देणे, पूरग्रस्तांसाठी प्रस्तावित उपाययोजनांना गती देणे तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा नियमित आढावा घेण्याबाबतही निर्देश देण्यात आले.शिक्षण क्षेत्रातील तयारीचा आढावा घेताना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक सुविधा वेळेत उपलब्ध करून देणे आणि गुणवत्तावाढीसाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.नागरिकांच्या तक्रारी व सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी जनसंवाद उपक्रमांतर्गत क्यूआर कोड प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राप्त तक्रारींवर पंधरा दिवसांच्या आत स्मरणपत्र प्रणालीद्वारे कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.




