११२ वर आलेल्या कॉल ची पोलिसांनी घेतली दखल;शेतकी संघातील दोन वाहनासह धान्याचे गोडावून सील कारवाई ने खळबळ

पाचोरा-
११२ वर फोनकॉल आल्याने पाचोरा पोलिसांनी दखल घेत शेतकी संघातील दोन वाहनासह धान्याचे गोडाऊन सील करण्यात आली असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कारवाई ने शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटने बाबत सविस्तर वृत्त असे की ,दि.२१ एप्रिल २०२४ रोजी पाचोरा पोलीस स्टेशनच्या ११२ वर धान्याची दोन वाहने भरून उभी असल्याबाबत फोनकॉल आल्याने पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दखल घेत सदरील प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक यांना दिल्याने त्यांनी तात्काळ दखल घेऊन शनिवारी रात्रीच पाचोऱ्यातील शेतकरी सहकारी संघात घटनास्थळी धाव घेतली व उभी असलेली वाहनासह गोडाऊन सील केले असून या ठिकाणी रात्री पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चौधरी, पोलिस हेड कॉन्स्टेबल मुकुंद परदेशी या दोन कर्मचाऱ्यांच्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला तसेच दिवसा पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंपी व योगेश पाटील यांना बंदोबस्त कामी नियुक्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी पाचोरा तहसीलदार प्रविण चव्हाणके यांना पोलीस स्टेशन तर्फे चौकशीसाठी पत्र दिले असून चौकशी अंती पुढील कारवाई करण्यात येणार आहे. आता पाचोरा तहसीलदार हे पोलीस स्टेशन ला काय अहवाल सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.