पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनची जुगार अड्ड्यावर धाड 1 लाख 56 हजार 410 रुपयांचा मुद्देमाल जप्त

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या ‘वॉश आऊट’ मोहिमेअंतर्गत बहुळा नदीच्या काठावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून 6 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ५६ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत पिंपळगाव हरे येथे बहुळा नदीच्या काठावर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार पो.हे.कॉ. १०३० अरुण राजपूत, पो.कॉ. २८५९ भारत पाटील व पो.कों. १५२ योगेश भिलखेडे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री करून अचानक छापा टाकला असता सहा जण जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळील रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम (पाचोरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनने हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी ‘वॉश आऊट’ मोहीम हाती घेतली आहे. गावागावांतील पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सट्टा, पत्ता जुगार, गावठी व देशी दारूची अवैध विक्री याबाबत माहिती संकलित करून नियोजनबद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ बहुळा नदीकाठील जुगार अड्ड्यावर धाड टाकून करण्यात आल्याने अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी जोरदार महिलावर्ग व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.



