अपघाती मृत्यूचा बनाव; कोट्यवधींच्या विमा फसवणुकीचे षडयंत्र उघडकीस, डॉक्टरांसह चार पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव-
अपघाती मृत्यूचा बनाव; कोट्यवधींच्या विमा फसवणुकीचे षड्यंत्र उघडकीस,आले असून चाळीसगावात डॉक्टरांसह चार पोलिसांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.९ मार्च दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला व त्यासंदर्भात तशी कागदपत्रे तयार करीत तब्बल ५० लाखांचा विमा मिळविण्यासाठीचा बनाव उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालययातील वैद्यकीय अधिकारी, मेहुणबारे पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी व मृताच्या कुटुंबीयांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शालिंदर जाधव हे १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद येथून मालेगावकडे दुचाकीने जात होते. त्या वेळी त्यांच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. त्यात राजेंद्र जाधव जखमी झाले. त्यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. तसा शवविच्छेदन अहवालही डॉक्टरांनी तयार करून दिला. त्यानंतर मेहुणबारे पोलीस ठाण्यात तशी नोंद करण्यात आली. पुढे याच कागदपत्रांच्या आधारे खासगी विमा कंपनीकडे विमाच्या रकमेसाठी खटाटोप सूरू असताना विमा कंपनीच्या खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडून चौकशीत मोठी फसवणुकीचा बनाव उघडकीस आला.
राजेंद्र जाधव यांचा मृत्यू २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या गंभीर आजाराने झाल्याचे समोर आले, तसेच चौकशीदरम्यान त्यांच्या घरातील छायाचित्रावर मृत्यूची तारीखही २३ फेब्रुवारी होती. शिवाय, ग्रामपंचायत मृत्यू नोंदणी रजिस्टरमध्ये नोंद नव्हती. याशिवाय, मृताच्या कागदपत्रांमध्ये वेगवेगळे पत्ते आढळून येत सुमारे १० विमा कंपन्यांकडून कोट्यवधींची पॉलिसी घेण्यात आल्याचेही समोर आले.
खोटा मृत्यू अहवाल दिल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, मृताची पत्नी अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव, कारचालक-मालक, मेहुणबारे पोलीस ठाण्यातील कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम, विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील व मृताचा भाऊ मिथुन जाधव यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




