प्रेमसंबंधातून पती,पत्नीने मिळून केली 25 वर्षीय तरुणाची हत्या, पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील वरसाडे तांडा येथे बेपत्ता झालेल्या तरुणाच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संजय भिमा राठोड (वय 33, रा. वरसाडे तांडा नं. 3, ता. पाचोरा) यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांचा भाऊ विजय भिमा राठोड (वय 25) हा दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11:30 वाजेपासून ते 25 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला होता. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता परंतु तो मिळून आला नाही.यावरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये 26 फेब्रुवारी 2026 रोजी मिसिंग रजिस्टर क्र. 15/2026 अन्वये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.दरम्यान या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी हाती घेतला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. या तपासात संजय परशुराम जाधव यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.सुरुवातीला आरोपी संजय जाधव पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरे देत होता. मात्र चौकशीत त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीत त्याने सांगितले की, त्याची पत्नी सोनाली संजय जाधव आणि बेपत्ता तरुण विजय राठोड यांच्यात प्रेमसंबंध होते.
या प्रेमसंबंधातून विजय राठोड याने सोनाली जाधव हिचे मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ काढले होते.आणि त्याद्वारे तिला धमकावत असल्याची माहिती आरोपी पती संजय जाधव याला मिळाली. या कारणावरून रागाच्या भरात संजय जाधव आणि त्याची पत्नी सोनाली जाधव यांनी मिळून विजय राठोड याची हत्या केली आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे उघड झाले.या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी संजय परशुराम जाधव आणि सोनाली संजय जाधव या दोघांना अटक केली. आरोपींना पाचोरा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी (जळगाव), अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम (पाचोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात पोउपनि विठ्ठल पवार, पोहेकॉ किरण ब्राम्हणे, अतुल पवार, अभिजित निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहीरे, सागर पाटील आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.प्रेमसंबंध, ब्लॅकमेल आणि संशय यांच्या गुंतागुंतीतून उघडकीस आलेल्या या खूनप्रकरणामुळे पाचोरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



