पाचोरा पोलिसांची उत्कृष्ट कारवाई; मोटारसायकल चोरीचा गुन्हा ४ तासांत उघड,आरोपी ताब्यात

पाचोरा-
पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा अवघ्या चार तासांत छडा लावत आरोपीस ताब्यात घेत चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही १२ तासांच्या आत पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत शंकर वाघ (वय ४२, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ८.३७ वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील राधाकृष्ण पेट्रोल पंप येथे त्यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो (लाल रंग, क्रमांक MH-19 BR-4211) ही मोटारसायकल पार्क करून ठेवली होती. मात्र काही वेळाने ती अज्ञात व्यक्तीने चोरी करून नेल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणी आरोपी तुषार लक्ष्मण आघाडे (वय २७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) प्रमाणे १४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी व पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, भारत डेअरी बसस्टॉप परिसरात एक संशयित व्यक्ती मोटारसायकलसह फिरताना दिसत आहे. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन संशयितास ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान त्याने आपले नाव तुषार लक्ष्मण आघाडे असल्याचे सांगितले व मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचासमक्ष आरोपीकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल राहुल काशिनाथ शिंपी यांनी केला असून आरोपीविरुद्धचे दोषारोपपत्र १२ तासांच्या आत पाचोरा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी व पोलीस कॉन्स्टेबल शरद मांगो पाटील यांनी केली.



