जळगाव जिल्हा

भडगावात विटभट्टीमुळे वाढते प्रदूषण; नागरिकांची तीव्र नाराजी, आमदार किशोर आप्पा पाटील यांना दिले निवेदन..

भडगाव-

भडगाव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील हकीम नगर, यासीन नगर आणि नुरानी नगर,परिसरात सुरू असलेल्या विटभट्टीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर, धूळ आणि घातक वायूंचा फैलाव होत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे ह्या सुरू असलेल्या विटभट्टी तात्काळ हटवून त्या जागेवर खेळाचे मैदान विकसित करावे, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाव्दारे केली आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, विटभट्टीतून सतत निघणाऱ्या धुरामुळे परिसरात हवेत काळसर धुक्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. घरांमध्ये धूळ साचत असून, श्वसनाचे विकार वाढत आहेत. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही नागरिकांनी श्वसनास त्रास, खोकला, डोळ्यांची जळजळ अशा तक्रारी वाढल्याचे सांगितले.“आमच्या मुलांना खेळायला मोकळी जागा नाही, आणि जी जागा आहे तिथे विटभट्टीमुळे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे एका स्थानिक पालकाने सांगितले.

नियमबाह्य असल्याची शक्यता; चौकशीची मागणी

सदर विटभट्टी निवासी भागालगत सुरू असल्याने ती नियमबाह्य असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. विटभट्टी मालकास नोटीस देऊन ती हटविण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मंजूर खेळाचे मैदान प्रकल्प रखडला

महत्त्वाचे म्हणजे, या जागेवर नगरपरिषदेमार्फत खेळाचे मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. मात्र, विटभट्टीमुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. त्यामुळे परिसरातील युवक आणि मुलांना खेळासाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत.
“नगरपरिषदेने प्रस्ताव मंजूर करूनही काम का होत नाही, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

जमीन सपाटीकरणासह मैदान उभारणीची मागणी

नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, विटभट्टी हटवून संपूर्ण जागा यंत्राच्या साहाय्याने सपाट करण्यात यावी. तसेच नदीपर्यंतचा परिसर सुरक्षित करून तिथे आधुनिक सुविधा असलेले खेळाचे मैदान उभारण्यात यावे. यामुळे परिसरातील तरुणांना आणि लहान मुलांना खेळण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होईल.

आमदारांना निवेदन; तातडीच्या कारवाईची अपेक्षा

या सर्व मागण्यांसंदर्भात नागरिकांनी आमदारांकडे निवेदन सादर केले असून, त्यांनी संबंधित प्रशासनाला आदेश देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या प्रकरणात तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रशासनाची भूमिका काय?

दरम्यान, या प्रकरणात नगरपरिषद व संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विटभट्टी हटवून खेळाचे मैदान उभारण्याचा निर्णय प्रत्यक्षात कधी येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!