पाचोऱ्यात भेसळ नाही का? FDA अधिकारी कारवाई करणार की डोळेझाक?

पाचोरा-
राज्यात ठिकठिकाणी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून भेसळखोरांवर धडक कारवाया सुरू असताना पाचोरा शहर आणि तालुक्यात मात्र सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, “पाचोऱ्यात भेसळ होत नाही का, की संबंधित यंत्रणा तपासणीच करत नाही?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर मांस-मटण विक्री, धूळ आणि माशांच्या सान्निध्यात खाद्यपदार्थांची विक्री, तसेच सुट्ट्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर आणि विक्री सुरू असल्याचे दिसून येते. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकारांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
यासोबतच शहरातील काही दूध डेअऱ्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या विविध पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः अवघ्या १० रुपयांत विकली जाणारी “मावा कुल्फी” खरोखरच माव्यापासून तयार केली जाते का? याची FDA कडून प्रयोगशाळा तपासणी होणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. आजच्या महागाईच्या काळात माव्याचे दर गगनाला भिडले असताना १० रुपयांत शुद्ध मावा कुल्फी उपलब्ध होऊ शकते का, असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.तसेच शहरातील दूध डेअऱ्यांमध्ये विकले जाणारे दूध, पनीर, मावा, लस्सी, श्रीखंड आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासली जाते का, याबाबतही नागरिकांमध्ये शंका व्यक्त होत आहे. FDA ने विशेष मोहीम राबवून नमुने घेऊन तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.दरम्यान, शहरातील काही भागांत सुरू असलेल्या गुटखा माफियांच्या बेकायदेशीर कारवायांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. बंदी असलेल्या गुटख्याची विक्री नेमकी कुठून आणि कशी सुरू आहे? संबंधित यंत्रणा कारवाई का करत नाही? अशा प्रश्नांची उत्तरे नागरिक मागत आहेत.पाचोरा शहर आणि तालुक्यात FDA, अन्न सुरक्षा विभाग, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून उघड्यावर सुरू असलेली खाद्यपदार्थ विक्री, मांस-मटण विक्री केंद्रे, दूध डेअऱ्या, सुट्टे तेल विक्रेते आणि गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार? पाचोऱ्यातील भेसळीचे वास्तव FDA अधिकाऱ्यांना दिसणार का? की कारवाईची प्रतीक्षा आणखी वाढणार? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनता विचारत आहे.




