BLO साहेबराव चौधरी जळगाव जिल्ह्यात अव्वल SIR चे काम केले शंभर टक्के पुर्ण

पाचोरा-
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या Special Intensive Revision (SIR) – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम पाचोरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) साहेबराव चौधरी यांनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेल्या मतदान यादी भाग क्र. १२८ चे SIR चे काम १०० टक्के पूर्ण करून जिल्ह्यात प्रथम होण्याचा मान मिळविला आहे.मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्या नियंत्रणाखाली १८ पाचोरा विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरभेटी देऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळत असून, Enumeration Form (EF) चे वितरण, संकलन व भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत मोबाईल अॅपवर माहितीचे डिजिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पाचोरा विधानसभा मतदारसंघात एकूण 354 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कार्यरत असून, सर्व अधिकारी नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.होळ(ता. पाचोरा) येथील मतदान यादी भाग क्र. १२८ चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी साहेबराव चौधरी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एकूण ८८९ मतदारांपैकी ८८१ मतदारांना Enumeration Form वितरित करून त्याचे डिजिटायझेशन पूर्ण केले असून, ८ मतदार Uncollectible म्हणून नोंदविले आहेत. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले SIR चे काम १०० टक्के पूर्ण करून जळगाव जिल्ह्यात सर्वप्रथम काम पूर्ण करणारे BLO म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भूषण अहिरे यांनी साहेबराव चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले आहे. तसेच त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन इतर सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनीही विशेष सखोल पुनरीक्षणाचे काम अचूक, गुणवत्तापूर्ण व विहित मुदतीत पूर्ण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या विशेष मोहिमेत नागरिकांनीही आपल्या संबंधित BLO यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.



