जामनेरमध्ये धारदार तलवारीसह एकास अटक

जामनेर-
जामनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातत्याने प्रभावी कारवाया करणाऱ्या जामनेर पोलिसांनी आणखी एक उल्लेखनीय कारवाई करत अवैधरित्या धारदार तलवार बाळगून फिरणाऱ्या एका इसमाला रंगेहात अटक केली आहे. आरोपीकडून ३२ इंच लांबीची स्टीलच्या पात्याची धारदार तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जुना बोदवड नाका परिसरात एक इसम हातात धारदार तलवार घेऊन संशयास्पदरीत्या फिरत असून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहे.या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. सहाय्यक फौजदार साहिल तडवी, पोलीस अधिकारी प्रताप मथुरे, सचिन महाजन, राजेश लहासे आणि गजानन माळी यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत संशयिताचा शोध सुरू केला.दरम्यान, पोलिसांना एक इसम हातात धारदार तलवार घेऊन फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव भिकन किसन घिसाडी (वय ४२), रा. गोविंद महाराज झोपडपट्टी, जामनेर, ता. जामनेर असे सांगितले.आरोपीकडून स्टीलच्या पात्याची, समोरून टोकदार मूठ असलेली ३२ इंच लांबीची धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ३२८/२०२६ भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४/२५ अन्वये नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन महाजन यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. कारवाईत सहाय्यक फौजदार साहिल तडवी, पोलीस अधिकारी प्रताप मथुरे, सचिन महाजन, राजेश लहासे आणि गजानन माळी यांनी धाडस, सतर्कता आणि तत्परतेने काम करत आरोपीला जेरबंद केले.



