पाचोऱ्यात बंद घर फोडून ७५ हजारांचा ऐवज लंपास अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल..

पाचोरा-
शहरातील गोविंद नगरी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करत रोख रक्कम व सोन्या-चांदीच्या वस्तूसह एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भगवान रामचंद्र पाटील (वय ५५, रा. गोविंद नगरी, आसाराम बापू आश्रम गार्डनजवळ, पाचोरा) हे १० जुलै रोजी पत्नीसमवेत कामानिमित्त चाळीसगाव येथे गेले होते. घराला कुलूप लावून ते बाहेरगावी असताना, १२ जुलै रोजी सकाळी शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती त्यांना दूरध्वनीवरून दिली.घरी परतल्यानंतर मुख्य दरवाज्याचे कुलूप तसेच घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले आढळले. कपाटाची पाहणी केली असता ४२ हजार रुपये रोख रक्कम, ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (अंगठी व मंगळसूत्र) तसेच ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे देव, असा एकूण ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ही घरफोडी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



