जळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन हद्दीतील वरखेडीत अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढल्याची तक्रार; कायमस्वरूपी बंद कारवाईची मागणी.

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरखेडी येथे सट्टा-जुगार तसेच अवैध दारू विक्रीचे प्रकार पुन्हा सुरू असल्याची चर्चा व नागरिकांच्या तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते चिराग शहा व रशीद शहा यांनी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देत वरखेडीतील कथित अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे.वरखेडी हे मोठी लोकसंख्या असलेले तसेच परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारासाठी महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, गावातील मुख्य बाजारपेठेसह काही भागांमध्ये सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सट्टा-जुगाराचे प्रकार सुरू असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. काही ठिकाणी किराणा दुकान, पानटपरी किंवा इतर व्यावसायिक दुकानांच्या आडून सट्ट्याचे व्यवहार होत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.काही ठिकाणी सट्ट्याचे आकडे दर्शविणारे फलक अथवा बोर्ड लावून खुलेआम व्यवहार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे असल्याचे तक्रारदारांनी अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे गावातील कायद्याचा धाक कमी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आठवडी बाजार परिसरावरही लक्ष देण्याची मागणी

वरखेडी येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो. या बाजारासाठी परिसरातील विविध गावांमधून महिला, मुली, विद्यार्थी, तरुण तसेच कुटुंबातील नागरिक मोठ्या संख्येने येतात. आठवडी बाजाराच्या परिसरातही सट्टा-बेटिंगच्या पेढ्या सुरू असल्याच्या तक्रारी असल्याने बाजार परिसरात विशेष पोलीस गस्त ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.सट्टा-जुगाराच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, त्यातून आर्थिक वाद, भांडणे, कर्जबाजारीपणा तसेच इतर गुन्हेगारी प्रकारांना प्रोत्साहन मिळू शकते, अशी चिंता तक्रारदारांनी व्यक्त केली आहे.

अवैध दारू विक्रीवरही कारवाईची मागणी

गावात अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले आहे. सट्टा-जुगारासोबतच अवैध दारू विक्रीवरही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित ठिकाणी तपासणी व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
केवळ एखाद्या दिवशी कारवाई करून थांबण्याऐवजी संबंधित ठिकाणांची गोपनीय माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, आवश्यक असल्यास पंचनामा करून कायदेशीर पुरावे संकलित करावेत आणि दोषी आढळणाऱ्यांवर लागू कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.

पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराच्या दिवशी विशेष पोलीस बंदोबस्त व गस्त ठेवावी. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजारपेठेत नियमित पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सट्टा-जुगाराचे अड्डे वारंवार सुरू होत असल्यास संबंधित ठिकाणांवर सातत्याने निगराणी ठेवावी. तसेच या अवैध प्रकारांना कोणाकडून संरक्षण किंवा पाठबळ मिळत आहे का, याची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.

कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
हा तक्रार अर्ज कोणत्याही व्यक्तीविरुद्ध वैयक्तिक आकसापोटी नसून वरखेडी गावातील कायदा व सुव्यवस्था, महिला व विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच सामाजिक वातावरण अबाधित राहावे, या सार्वजनिक हिताच्या उद्देशाने करण्यात आल्याचे तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या तक्रारीची पोलीस प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि वरखेडीतील कथित सट्टा-जुगार व अवैध दारू विक्रीच्या प्रकारांवर प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे वरखेडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!