शेतीच्या वादातून रक्तरंजित खेळ; मित्राला लोखंडी पाईपने संपवून मृतदेह गोणीत भरला आणि बहुळा नदीत फेकला; गुन्ह्याचा उलगडा, दोघे गजाआड

पाचोरा-
शेतीच्या व्यवहारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून पाचोरा तालुक्यात आलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह गोणीत भरून बहुळा नदीच्या पात्रात फेकून दिला होता. मात्र, जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पाचोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही दिवसांत या थरारक हत्याकांडाचा छडा लावला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवासी संजय धनराज तेली (वय ५० वर्षे) हे दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी शेतीच्या व्यवहारासाठी पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे आले होते. मात्र, तेथून ते अचानक बेपत्ता झाले. अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी त्यांचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत फिर्यादीने पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ५४०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १४०(३) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाचे आदेश दिले. तपास पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गोराडखेडा येथील संशयित आरोपी १) राहुल धर्मा पाटील (वय ४५ वर्षे) आणि २) संजय वामन भिल्ल (वय ५५ वर्षे) यांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच खुनाचे धक्कादायक वास्तव समोर आले.
मुख्य आरोपी राहुल धर्मा पाटील याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. मयत संजय धनराज तेली यांच्यासोबत असलेल्या शेतीच्या वादातून त्याने लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यात जबर प्रहार करून त्यांचा जागीच खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी दुसरा आरोपी संजय वामन भिल्ल याच्या मदतीने मृतदेह एका गोणीत भरून बहुळा नदीत फेकून दिला. आरोपींच्या कबुलीनंतर पोलिसांनी बहुळा नदीपात्रात शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला.मृतदेह हस्तगत झाल्यानंतर आणि खुनाचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ ची गंभीर वाढीव कलमे १०३(१) (खून), २३८ (पुरावा नष्ट करणे), १४०(१), ३(५), आणि ३१५ लागू केली आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल कायदेशीर तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप शेवाळे हे करीत आहेत.संपूर्ण कारवाई श्रीकांत धिवरे (पोलीस अधीक्षक, जळगाव)अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव), आणि बापू रोहम (उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा) राहुलकुमार पवार (पोलीस निरीक्षक, पाचोरा पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB), जळगाव पथक पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे,पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील पोलीस नाईक राहुल पाटील,पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील,पोलीस कॉन्स्टेबल,रतन गिते,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील पोलीस कॉन्स्टेबल,भूषण पाटील,चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप शेवाळे,
पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली.



