जळगाव जिल्हा

गुटखा माफियांची नवी शक्कल? रेल्वेमार्गे तस्करी, रोजंदारीवर माणसे ठेवल्याची चर्चा..


पाचोरा-


प्रतिबंधित गुटख्याची तस्करी करण्यासाठी काही गुटखा माफियांनी नवी शक्कल लढवल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. वाहनांमधून गुटखा वाहतूक करताना कारवाया वाढल्याने आता रेल्वे मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याचे अलीकडील कारवायांवरून दिसून येत आहे. मध्यप्रदेशातून गुटखा आणण्यासाठी काहींनी रोजंदारीवर माणसे ठेवल्याचीही चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव अन्न सुरक्षा विभागाने पाचोरा शहरात गुटख्याविरोधात कारवाई केली होती. मात्र, त्या कारवाईनंतर शहरासह ग्रामीण भागात प्रतिबंधित विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूची विक्री पुन्हा जोमाने सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
कारवाई सुरू असताना सुमारे १७० रुपयांना मिळणारे विमल पान मसाल्याचे पॅकेट २८० ते २९० रुपयांपर्यंत विकले जात असल्याची माहिती समोर आली होती. काही जण पानटपऱ्यांवर फेऱ्या मारून गुटख्याचा पुरवठा करत असल्याचे, तर काही जण घाऊक विक्री करत असल्याचेही बोलले जात होते.काही पान टपऱ्यांवाल्याच्या म्हणण्यानुसार, सध्या पाचोरा शहरासह ग्रामीण भागात तेच पॅकेट २१० ते २२० रुपयांत उपलब्ध होत आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अन्न सुरक्षा विभागाने सुरुवातीच्या कारवाईनंतर पुढील कारवाया का थांबल्या, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पाचोरा शहरासह ग्रामीण भागात गुटखा नेमका कोणत्या मार्गाने आणला जातो, याचा सखोल तपास करून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रतिबंधित गुटख्याची तस्करी, साठवणूक आणि विक्री रोखण्यासाठी अन्न सुरक्षा विभाग, रेल्वे सुरक्षा दल (RPF), जीआरपी आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून गुटखा माफियांच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!