नांद्रा ते न्यूयॉर्क : बचत गटातून जागतिक भरारी,अनिता सोनवणे यांच्या ‘लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूहा’ची प्रेरणादायी यशोगाथा

जळगाव-
जळगाव जिल्ह्यातील नांद्रा बु. या छोट्याशा गावातील महिलांनी आत्मविश्वास, जिद्द आणि शासनाच्या योजनांच्या बळावर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. अनिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत ‘लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूहा’ने तांब्याच्या वस्तूंच्या उत्पादनातून थेट अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आपली छाप पाडली आहे.
शेतमजुरीतून उद्योगाच्या वाटेवर
नांद्रा बु. गावात साध्या परिस्थितीत राहणाऱ्या अनिता सोनवणे या पूर्वी शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. हंगामी स्वरूपाच्या या कामातून स्थैर्य मिळत नसल्याने त्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली. याच काळात महिला बचत गट चळवळीची प्रेरणा मिळाली.
कौटुंबिक परंपरेतून तांब्याचे दिवे बनविण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आणि 10 महिलांना एकत्र आणत ‘लक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूहा’ची स्थापना केली. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या क्षेत्रात महिलांनी यशस्वी पाऊल टाकले.
‘उमेद’ अभियानामुळे विस्ताराला गती
राज्य शासनाच्या उमेद अभियान अंतर्गत मिळालेल्या प्रशिक्षण व प्रदर्शनांच्या संधीमुळे समूहाला मोठ्या बाजारपेठा खुल्या झाल्या. जळगावपासून सुरुवात करत त्यांनी मुंबई, पुणे, नाशिक, दिल्ली यांसारख्या शहरांत आपली उत्पादने सादर केली.
तांब्याचे दिवे, पाणी बॉटल, ग्लास अशा आकर्षक व दर्जेदार उत्पादनांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. गुणवत्ता आणि सातत्य यामुळे समूहाची ओळख मजबूत झाली.
मान्यवरांकडून गौरव
समूहाच्या कार्याची दखल घेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदर्शनात भेट देऊन उत्पादनांचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वतः या वस्तू खरेदी करून प्रोत्साहन दिले.
अमेरिकेतही ठसा
ग्रामीण विकास विभागामार्फत आयोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी समूहाची निवड झाली. या प्रदर्शनात सहभाग घेत अनिता सोनवणे यांनी तांब्याच्या वस्तूंचे सादरीकरण अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे केले. त्यामुळे नांद्रा गावातील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली आणि समूह ‘ग्लोबल’ बनला.
महिलांसाठी रोजगार आणि आत्मनिर्भरता
या उपक्रमामुळे गावातील अनेक महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला आहे. शेतमजुरीवर अवलंबून असलेल्या महिलांना आता स्थिर उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून विक्री होत असल्याने उत्पन्नातही वाढ झाली आहे.
प्रेरणादायी संदेश
अनिता सोनवणे यांच्या यशकथेने हे सिद्ध केले आहे की, योग्य मार्गदर्शन, शासकीय योजना आणि जिद्द यांच्या जोरावर ग्रामीण महिलाही जागतिक स्तरावर यश मिळवू शकतात. “असाध्य ते साध्य” हा संदेश त्यांच्या कार्यातून प्रत्यक्षात उतरलेला दिसून येतो.
जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव



