क्राईम

पार्सल घेऊन आल्याचा बनाव करुन,दिवसा ढवळ्या जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना पाचोरा पोलीसांनी केले जेरबंद.

पाचोरा-

पाचोऱ्यात भरदिवसा घडलेल्या जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही तासांत छडा लावत आरोपींना जेरबंद करण्यात पाचोरा पोलीसांना यश आले असून या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. जळगाव जिल्ह्यात चोरी, घरफोडी आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाने या प्रकरणात अत्यंत वेगाने हालचाली करून गुन्ह्याचा उलगडा केला.सविस्तर वृत्त असे की, दिनांक १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ०३:१५ वाजेच्या सुमारास सौ. कुसुम एकनाथ मोकळे (वय ४२), व्यवसाय शेती, मूळ रा. सातगाव डोंगरी ता. पाचोरा, सध्या लक्ष्मी आंगन कॉलनी, शक्तीधामच्या पाठीमागे, पाचोरा येथे वास्तव्यास असताना काही व्यक्तींनी त्यांच्या घरावर डाव साधला. आरोपींनी अमेझॉनचे पार्सल घेऊन आल्याचा बनाव करत घराचा दरवाजा उघडून घेतला. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि घरातील महिलांना व लहान मुलांना धाक दाखवत एका ठिकाणी बसवून ठेवले. यावेळी आरोपींपैकी एका व्यक्तीने बंदुकीसारख्या वस्तूचा धाक दाखवत घरात सोन्याच्या चिपा असल्याची विचारणा केली. भीतीचे वातावरण निर्माण करून त्यांनी घरातील कपाटांची झडती घेतली. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत त्यांनी रोख रक्कम हस्तगत केली. घरातील सात हजार रुपये तसेच मुलाच्या गळ्यातील सातशे रुपये घेऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा तातडीने कामाला लागली. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध तांत्रिक माहिती, स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करत तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. तपासादरम्यान दिनांक १३ जून २०२६ रोजी चेतन उर्फ जितु प्रभाकर भुतेकर (वय २१), रा. सातगाव डोंगरी ता. पाचोरा याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. त्याचा मामा गोकुळ महादु वाघ (पाटील) (वय ३७), रा. सातगाव डोंगरी याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तपास पुढे सरकत असताना अनोळखी आरोपींपैकी योगेश परशराम शिंदे (वय ३१), व्यवसाय खासगी नोकरी, रा. प्लॉट नं. ४९/५०, दर्शन कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. १८, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक याचा सहभाग उघड झाला. त्याच्याकडून गुन्ह्यातील ७,७०० रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्हा करताना वापरण्यात आलेली नकली खेळण्यातील पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या सखोल चौकशीतून या गुन्ह्यामागील संपूर्ण कटही उघडकीस आला. फिर्यादींच्या घरात सोन्याच्या चिपा असल्याची माहिती गोकुळ महादु वाघ (पाटील) याला मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्याने चोरीचा कट रचला. त्याने ही माहिती त्याचा मित्र नितीन पाटील, रा. पाचोरा याला दिली. नितीन पाटील याने त्याच्या परिचयातील दोन व्यक्तींना संपर्क करून या गुन्ह्याच्या नियोजनात सहभागी करून घेतले. त्यानंतर चेतन उर्फ जितु प्रभाकर भुतेकर याला सोबत घेऊन फिर्यादींच्या घरात जबरी चोरी करण्यात आली. तपासात गोकुळ महादु वाघ (पाटील) आणि निष्पन्न आरोपी नितीन पाटील यांनी या गुन्ह्यासाठी अपप्रेरणा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्ह्याचा तपास केवळ आरोपी अटक करण्यापुरता मर्यादित न ठेवता त्यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यावर पाचोरा पोलिसांनी भर दिला. त्यामुळे गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार, नियोजन करणारे आणि प्रत्यक्ष सहभागी आरोपी यांच्यापर्यंत पोहोचण्यात यश आले. या कामगिरीमुळे तपासातील व्यावसायिकता आणि पोलिसांची गुन्हे उघडकीस आणण्याची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. ही
उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर
पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस
अधिकारी पाचोरा बापुसाहेव रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ,सफौ विलास पाटील, पोकॉ योगेश पाटील, हरीष परदेशी,गणेश कुंवर, श्रीराम शिंपी आणि नितीन भालेराव यांनी या तपासात मोलाची भूमिका बजावली.घटनेचा अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ हे करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!