महिलांच्या तक्रारीची थेट दखल; कुरंगी गावातील अवैध दारू विक्रेत्याला अटक
पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात महिलांनी केलेल्या तक्रारींची पाचोरा पोलिसांनी तातडीने दखल घेत प्रभावी कारवाई केली आहे. कुरंगी (ता. पाचोरा) येथे घराच्या आडोशाला बनावट देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एका २९ वर्षीय इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विष्णू उर्फ विक्की राजू पाटील (मराठे, रा. कुरंगी, ता. पाचोरा) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनचे पथक नियमित गस्तीवर असताना कुरंगी गावात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. गावातील महिलांनी वारंवार केलेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या दारूचा साठा करून त्याची चोरटी विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर देविदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुषार विसपुते करीत आहेत.
ग्रामीण भागातील अवैध दारू विक्री व बेकायदेशीर व्यवसायांविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. महिलांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देत केलेल्या या कारवाईचे परिसरात स्वागत होत आहे.



