क्राईमजळगाव जिल्हा

अवैध गॅस साठ्यावर पुरवठा विभागाचा छापा; जारगाव चौफुली येथून 18 सिलिंडर जप्त;

पाचोरा-

जारगाव चौफुली येथे अवैधरित्या गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभाग आणि पाचोरा पोलीसांच्या संयुक्त कारवाईत 18 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी अकबर मशिदखान (वय 38, रा. जारगाव चौफुली, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल गोविंदराव पवार यांनी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मे 2026 शनिवार रोजी तहसील कार्यालयात नियमित कामकाज सुरू असताना जारगाव चौफुली येथे अकबर मशिदखान यांच्या घराखालील गोडाऊनमध्ये अवैध गॅस हंड्यांचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
ही माहिती मिळताच राहुल पवार यांनी तात्काळ पाचोरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ शिंपी यांना मदतीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर पुरवठा विभागाचे कर्मचारी आणि पोलीसांनी संयुक्तपणे घटनास्थळी धाव घेत दुपारी 1वाजेच्या सुमारास  छापा टाकला.
छाप्यात एकूण 18 गॅस सिलिंडर आढळून आले. त्यामध्ये 14 व्यवसायिक आणि 4 घरगुती सिलिंडरचा समावेश होता. 9 सिलिंडर भरलेले तर 9 रिकामे होते. जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरमध्ये HP, GAS-ONE, BPCL, HPCL आणि 3PCL कंपनीच्या गॅस हंड्यांचा समावेश होता. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 62 हजार 400 रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अकबर मशिदखान याला याबाबत विचारणा केली असता, सर्व सिलिंडर स्वतःच्या मालकीचे असल्याचे कबुली त्याने दिली. त्याचा जबाब नोंदवून पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला.
या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ज्वलनशील गॅस सिलिंडरचा बेकायदेशीर साठा केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 287 तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईदरम्यान पुरवठा निरीक्षक प्रभारी राहुल पवार, लिपिक शुभम सपकाळे, लिपिक सोमनाथ मिस्तरी, लिपिक भाग्यश्री देवढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अवैध गॅस साठेबाजांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!