ध्वजारोहणाच्या दिवशीच ग्रामपंचायत परिसरात अस्वच्छता; दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची स्वप्नील कुमावत यांची मागणी!

पाचोरा-
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पाचोरा तालुक्यातील वडगांव बुद्रुक ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता न राखल्याचा आरोप करत ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. याप्रकरणी रहिवासी स्वप्नील कुमावत यांनी पंचायत समिती पाचोरा येथील गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करून चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.केलेल्या तक्रारीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय परिसराची आवश्यक साफसफाई करण्यात आली नव्हती. कार्यालयासमोर कचरा व घाण तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ गाजरगवत व इतर गवत वाढलेले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय सणाच्या दिवशी अशा अस्वच्छ वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आल्याने राष्ट्रीय सणाच्या आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला बाधा पोहोचल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व जबाबदार लोकप्रतिनिधींवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी स्वप्नील कुमावत यांनी केली आहे. प्रशासन या तक्रारीची काय दखल घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




