जळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे पुन्हा बोकाळले?
“पोलीसांचा धाक संपला का?” नागरिकांमध्ये चर्चा


पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळगाव हरेश्र्वर,वरखेडीसह परिसरातील विविध गावांमध्ये अवैध दारू, सट्टा-मटका, पत्ता-जुगार तसेच इतर अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. त्यामुळे “अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा धाक संपला का?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.परिसरात अवैध दारूची विक्री सुरू असल्याने अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर सट्टा-मटका, पत्ता व जुगाराच्या प्रकारांमध्ये कष्ट करून कमावलेला पैसा झटपट दुप्पट करण्याच्या मोहापायी अनेक जण आर्थिक अडचणीत सापडत असल्याची चर्चा आहे. काही नागरिक कर्जबाजारी होत असल्याने या अवैध प्रकारांचा सामाजिक परिणाम गंभीर असल्याचे बोलले जात आहे.निवेदनानंतरही अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते चिराग शहा यांनी परिसरातील अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही परिसरात अवैध प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने “हे प्रकार स्थानिक पोलिसांना दिसत नाहीत का?” असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.सामाजिक कार्यकर्त्यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यावे लागत असेल, तर स्थानिक पोलीस प्रशासनाची भूमिका काय, असा सवालही चर्चेत आहे.

एप्रिलमधील उपोषणाच्या आश्वासनाची आठवण

१४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सामाजिक कार्यकर्ते कैलास तांबे, पत्रकार चंदू खरे, निलेश पाटील आणि कुंदन बेलदार यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते.यावेळी उपोषणस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडून काही कारवाया करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा अवैध धंदे सुरू झाल्याचा आरोप होत असल्याने त्या कारवायांचा कायमस्वरूपी परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गुटखा, अवैध दारू विक्रीचीही चर्चा काही सामाजिक कार्यकर्ते व जाणकार नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पिंपळगाव हरेश्वर व परिसरातील गावांमध्ये विमल गुटख्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची चर्चा आहे. तसेच अवैध गावठी दारू आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्रीही सुरू असल्याचे आरोप करण्यात येत आहेत.या आरोपांची पोलीस प्रशासनाने प्रत्यक्ष तपासणी करून सत्यता पडताळणे आवश्यक आहे. अवैध प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“निवेदन आणि उपोषणापुरतीच कारवाई?” असा सवाल अवैध धंदे बंद करण्यासाठी निवेदन, आंदोलन आणि उपोषण झाल्यानंतर काही काळ कारवाई होत असल्याचे दिसते; मात्र त्यानंतर पुन्हा हेच प्रकार सुरू होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कारवाई केवळ तात्पुरती न राहता अवैध धंद्यांच्या मुळावर घाव घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारींमध्ये कितपत तथ्य आहे, याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी
परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावांमध्ये सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारू, सट्टा-मटका, जुगार व इतर अवैध धंद्यांची वरिष्ठ स्तरावरून तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.अवैध धंद्यांना कायमस्वरूपी आळा बसतो का, की पुन्हा काही दिवसांनी परिस्थिती जैसे थे होते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!