आमदार अमोल पाटलांचा एरंडोल पोलीस ठाण्यात ४ तास ठिय्या: खंडणीखोर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल..

एरंडोल-
चहा विक्रेत्याकडून १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्याविरुद्ध अखेर एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथील मढीजवळ चहा विक्री करणारे गजानन माधवराव महाजन यांच्या दुकानावर दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर हिंमतराव बाविस्कर हे चार साथीदारांसह आले होते. दुकानात कोणताही प्रतिबंधित तंबाखू किंवा गुटखा आढळला नसतानाही “तुझ्यावर गुटख्याचा गुन्हा दाखल करतो” अशी धमकी देत त्यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी महाजन यांनी ही रक्कम दिल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, याच अधिकाऱ्याने एरंडोल परिसरातील इतर छोट्या व्यावसायिकांकडूनही धाडीच्या नावाखाली सुमारे २० हजार रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब आमदार अमोल पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाईचा पवित्रा घेतला.मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता आमदार पाटील कार्यकर्त्यांसह एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, सुरुवातीला पोलीसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत पाटील यांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.या दरम्यान मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाल्याने पोलीस ठाण्याचा परिसर तणावपूर्ण झाला.अखेर पोलिसांना नमते घ्यावे लागले आणि रात्री उशिरा किशोर बाविस्कर व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध खंडणी उकळल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.या प्रकरणी गजानन महाजन यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आमदार पाटील यांच्या आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.



