तलवार फिरवत दहशत माजवणाऱ्या इसमास भडगाव पोलिसांनी केले जेरबंद

भडगाव-
भडगाव पोलिस स्टेशन हद्दीत तलवार हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ मे रोजी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वडजी (ता. भडगाव) येथे एक इसम उघडपणे तलवार घेऊन फिरत असल्याचे समजले. तत्काळ पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीकडून सुमारे २ फूट ७ इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या तलवारीची किंमत अंदाजे ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेली तलवार धारदार असून ती वापरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले.
या प्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शरद उत्तम गायकवाड (वय २९, रा. वडजी, ता. भडगाव) असे असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सक्रिय सहभाग होता.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. सहा, पो नि प्रदीप एकशिंगे पी एस आय, सुशील सोनवणे सुनील राजपूत, प्रवीण परदेशी, निलेश ब्राह्मणकर रवींद्र पाटील गोवर्धन बोरसे या पथकांनी ही कारवाई केली.



