बदलीनंतरही पदभार न सोडणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी;पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांविरोधातही चौकशी करण्याची हरीभाऊ पाटील यांनी केली मागणी..

पाचोरा-
जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांनंतर बदली झालेल्या ठिकाणी रुजू न झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सौ. कल्याणी वर्मा यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे व पोलीस प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात श्री. हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. जिल्हा पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्यानंतरही काही जण बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच काही प्रभारी अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून कार्यमुक्त न करता बदली आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याबाबत विशेष आरोप पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सौ. कल्याणी वर्मा यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे तसेच पोलीस प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

प्रशासकीय सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतरही काही पोलीस कर्मचारी अद्याप पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पदाचा गैरवापर करून संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक वर्षे एकाच ठिकाणी ठेवण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकाराबाबत यापूर्वी प्रत्यक्ष भेट तसेच सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप संदेशाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही शासकीय कारवाई करण्यात आलेली नसल्याचा दावा निवेदकाने केला आहे.
निवेदनात बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू करण्याचे आदेश द्यावेत, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई करावी, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सौ. कल्याणी वर्मा यांच्याविरोधात पारदर्शक चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी आणि करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल व छायांकित प्रत शासकीय मुदतीत उपलब्ध करून द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन नियमांचे पालन करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा निवेदक श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी व्यक्त केली आहे.



