क्राईमजळगाव जिल्हा

पाचोरा तालुक्यातील बाळद बु! ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकासोबत झटापट, शासकीय दस्तऐवज फाडल्याचा आरोप; पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल.

पाचोरा-

तालुक्यातील बाळद बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ग्रामसेवकाला शिवीगाळ व झटापट केल्याची, तसेच शासकीय दस्तऐवज फाडून सरकारी कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणी एका विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये शेखर पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेयजल योजनेच्या तक्रारीवरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, बाळद बुद्रुक येथील ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी संजय आनंदा पाटील हे गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात दैनंदिन कामकाज करत होते. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या तक्रारींच्या निवारणासाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याने ग्रामसेवक व कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते.

याचदरम्यान सकाळी साडेआठच्या सुमारास बाळद येथील रहिवासी व सध्या विद्युत कॉलनी, पाचोरा येथे राहणारे संशयित  शेखर पाटिल ग्रामपंचायत कार्यालयात आले. त्यांनी पेयजल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ग्रामसेवकांकडे ‘प्रोसिडिंग बुक’ म्हणजेच इतिवृत्त पुस्तक दाखविण्याची मागणी केली.

नियमानुसार प्रोसिडिंग बुक पाहता येणार नसल्याचे ग्रामसेवकांनी सांगितल्यानंतर वाद वाढल्याचा आरोप आहे. संशयिताने अरेरावी करत कपाटातील पुस्तक जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला.

झटापटीत प्रोसिडिंग बुकची पाने फाटली

ग्रामसेवकांनी विरोध केल्यानंतर संशयिताने त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करून जोराने लोटून दिले व अंगावर धावून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या झटापटीत ग्रामसेवक खाली पडले. त्यांनी प्रोसिडिंग बुक घट्ट धरून ठेवल्याने त्याची काही पाने फाटल्याचे सांगण्यात आले.

यावेळी कार्यालयातील शिपाई दिगंबर पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य सचिन सोमवंशी यांनी मध्यस्थी करून ग्रामसेवकांची संशयिताच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयिताने ग्रामसेवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना धमकी दिल्याचा आरोप असून, तो तेथून निघून गेला.

 विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

ग्रामसेवक संजय पाटील यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १३२, २२१, ३२४(३), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!