क्राईम

सोलर कॉपर वायर चोरी प्रकरणी ९ आरोपी जेरबंद; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त, भडगाव पोलिसांची कामगिरी.

भडगाव-

भडगाव पोलिसांनी तत्परता, नियोजनबद्ध तपास आणि जलद कारवाईचे उत्कृष्ट उदाहरण घालत सोलर प्लांटमधील कॉपर वायर चोरीच्या प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावला. या कारवाईत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे ५ लाख १५ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे सोलर प्रकल्पांमधील चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलैच्या मध्यरात्री भडगाव पोलीस ठाण्याचे पथक नियमित गस्त घालत असताना काही इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीमुळे आरोपींनी भडगाव रोडलगत असलेल्या सोलर प्लांटमधून कॉपर वायर चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून सर्व आरोपींना अटक केली.चौकशीनंतर आरोपींकडून चोरी केलेली सुमारे ४ हजार मीटर सोलर कॉपर वायर, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, चोरीसाठी वापरण्यात आलेली इतर साधने, ८ मोबाईल फोन, एक मोटारसायकल असा एकूण ५ लाख १५ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी जप्त केलेला हा मुद्देमाल पंचनामा करून ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात येत आहेत.या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून जळगाव जिल्ह्यासह परिसरातील इतर चोरीच्या घटनांबाबत सखोल चौकशी सुरू असून, या तपासातून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पडताळणी करण्यात येत आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्यासह गोवर्धन बोरसे, निलेश ब्राम्हणकर, हंसराज देशमुख, भावराव पाटील, दीपक पाटील, प्रवीण परदेशी, सुनील राजपूत, संदीप सोनवणे आणि प्रदीप परदेशी यांनी विशेष परिश्रम घेतले. पुढील तपास पोहेका गोवर्धन बोरसे करीत आहेत.

अटकेत असलेल्या आरोपीचे नावे

जानकीराम भागवत मोरे (२२)

रवि सोमा भिल (२२)

सुका संजय भिल (१९)

अनिल अर्जुन भिल (२७)

शुभम सुरेश भोई (२३)

योगेश दिगंबर भिल (२०)

संजय नारायण सोनवणे

आदील शेख शफिक मणियार (४८)

जितु यशोनाथ पवार (२०)

सर्व राहणार  इंदिरा नगर, शिरसोली, ता. जि. जळगाव.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!